सिलिकॉन व्हॅलीमध्ये पुन्हा भरभराटीचे दिवस आले आहेत. हायवे १०१ च्या लगतच्या ऑफिस बिल्डींग्स वर पुन्हा नव्याने आशेने प्रेरित स्टार्ट-अप्सचे फलक दिसायला लागले आहेत. घरभाडी वाढत आहेत, त्याबरोबरच लेक टाहो सारख्या रिसॉर्ट्सच्या शहरांमध्ये सुट्टीतल्या घरांसाठीची मागणीही वाढत आहे. सुबत्ता वाढीला लागत आहे याचंच हे लक्षण आहे. सेमीकंडक्टर उद्योग आणि त्यामागोमाग भरभराटीला आलेल्या संगणक आणि इंटरनेट कंपन्या यांची बे-एरिया ही जन्मभूमी होती. इथल्या जादूगारांनी निर्मिलेल्या नवलाईच्या गोष्टींनी जगाला भविष्यातील राहणीची जाणीव करून दिली. टच-स्क्रीन फोनपासून, महान ग्रंथालयातील जे हवे ते क्षणार्धात शोधून काढण्यापर्यंत, ते बसल्या जागेहून हजारो मैल दूरवर असलेल्या ड्रोनला चालवण्याच्या क्षमतेपर्यंत. २०१० पासून इथल्या व्यावसायिक क्षेत्राचे झालेले पुनरुज्जीवन हेच सूचित करते की भरधाव प्रगती होत आहे.
हे सगळं पाहता, ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे की, सिलिकॉन व्हॅलीमधील काहींच्या मते हे ठिकाण आता थंडावले आहे आणि नवकल्पकतेचे प्रमाण अनेक दशकांपासून कमी होत आहे. पे-पाल (PayPal) कंपनीचा संस्थापक आणि फेसबुकमधील पहिला बाह्य-गुंतवणूकदार पीटर थिएल म्हणतो, अमेरिकेतील नवकल्पकता सध्या “रसातळाला जाणे आणि मृतप्राय होणे यांच्या मध्ये कुठेतरी आहे”. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अभियंत्यांची सुद्धा हीच भावना आहे. तर अर्थशास्त्रज्ञांचा एक छोटासा परंतु वाढत चाललेला गट मानतो की, आजच्या नवकल्पनांचा आर्थिकदृष्ट्या होणारा प्रभाव भूतकाळाच्या तुलनेत अगदीच फिका आहे.
[ . . . ]
कार्यक्षमता (संगणकांची) वाढलेली आहे आणि स्वस्तही आहे, त्यामुळे त्यावर आधारित कल्पनांची सगळीकडेच चलती आहे. संगणकांना आता नैसर्गिक भाषा समजायला लागली आहे. फक्त शारीरिक हालचालींद्वारे लोक व्हिडिओ गेमचे नियंत्रण करू लागले आहेत - एक असे तंत्रज्ञान ज्याचा व्यावसायिक जगामध्ये लवकरच वापर होऊ लागेल. त्रिमिती (3D) प्रिंटिंग द्वारे अनेक प्रकारच्या गुंतागुंतीची रचना असलेल्या वस्तू देखील भराभर तयार करता येत आहेत, लवकरच हे तंत्रज्ञान वापरून मानवी ऊती (human tissue) आणि जैव/सेंद्रिय सामग्री सुद्धा बनवता येऊ शकेल.
नवकल्पनांबद्दल निराशावादी असणारे याला “पोकळ गप्पा” समजून उडवून लावतील. पण, तंत्रज्ञानामुळे चालना मिळणारी प्रगती कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरत सुरुच राहील किंवा तिला सतत उतरती कळाच लागेल असे समजणे इतिहासाशी विसंगत आहे. या प्रगतीमध्ये चढउतार असणारच. शिकागो युनिव्हर्सिटीमधील चॅड सिव्हर्सन आवर्जून सांगतात की, विद्युतीकरणाच्या युगात झालेली उत्पादनक्षमतेमधील वाढ देखील थोडीफार अनियमितपणे, अडखळत झाली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा विद्युत तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण नवकल्पना उदयाला आल्या, तेव्हा प्रगतीची वाढ मंदच होती; तिने वेग या कालावधीनंतर घेतला.